शिर्डी -
श्री साईबाबांच्या दैनंदिन तीन्ही आरतीसाठी वस्त्र चढविण्याकरीता प्रत्येक गुरुवारची काकड आरतीचे व प्रत्येक रविवारची माध्यान्ह आरतीचे राखीव ठेवलेले स्लॉट रद्द करुन आता भाविकांकरीता सोडत पध्दतीने उपलब्ध करुन देण्याचा निर्णय तदर्थ समितीने घेतला असून भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले.
श्री.जाधव म्हणाले, भाविकांना श्री साईबाबांच्या आरती प्रसंगी वस्त्र चढवण्याची इच्छा असते. याकरीता संस्थानच्या वतीने सन २०१६ मध्ये कार्यपध्दती ठरवुन दैनंदिन ०३ आरत्यांसाठी भाविकांचे वस्त्र चढवणे सुरु करण्यात आले. तसेच दिनांक २३.०५.२०१७ रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत समितीच्या सदस्यांना प्रत्येक गुरुवारची काकड आरती व प्रत्येक रविवारची माध्यान्ह आरती करीता राखीव वस्त्र ठेवणेबाबत निर्णय घेण्यात आला होता. परंतु दैनंदिन तीन्ही आरत्याचे सर्वच दिवस फक्त भाविकांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा व समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी अधोरेखीत केले. त्यानुसार दिनांक ०५ डिसेंबर २०२२ रोजीच्या सभेत गुरुवार व रविवार या दिवशी राखीव ठेवलेल्या स्लॉटला देखील ड्रॉ पध्दतीने भाविकांचे वस्त्र ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे आता श्री साईबाबांच्या दैनंदिनीच्या तीन्ही आरत्यांना सर्व दिवस भाविकांना वस्त्र चढवण्याचा लाभ मिळणार आहे.
प्रत्येक महिन्याला सुमारे १ हजार वस्त्र भाविकांकडून देणगी काऊंटरवर जमा केली जातात. यापैकी तीन आरत्यांच्या स्लॉट प्रमाणे ९० वस्त्र सोडत पध्दतीने निवडुन त्याची यादी केली जाते. सदरची यादी संस्थानच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करुन याबाबत भाविकांना आपले वस्त्र कोणत्या आरतीस चढविले जाईल याबाबत मोबाईल संदेशव्दारे कळविले जाते.